विशेष प्रतिनिधी । प्रफुल्ल पाटील
यंदाचं वर्ष हे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचं वर्ष म्हणून जगभर साजरं केलं जातंय. आपल्या विरोधकांनाही प्रेमात पाडणाऱ्या गांधीजींचा तीव्र द्वेष करणारे लोकही आहेतच. शरद पोंक्षे हे त्यातीलच एक. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेल्या आणि नुकत्याच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या शरद पोंक्षे यांची माध्यमविश्वात पुन्हा नव्याने एंट्री होत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ‘माझा कट्टा’ या विशेष उपक्रमात ते दर्शकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसतील.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातून नथुराम गोडसेची बाजू मांडण्याचं काम शरद पोंक्षे यांनी बराच काळ केलं. या भूमिकेसाठी त्यांना लोकशाहीवादी कार्यकर्ते, गांधीवादी विचारवंत यांच्याकडून वारंवार त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. असं असतानाही ते कायम आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. लोक जसे गांधीजींचे विचार ऐकतात, तसेच त्यांनी नथुरामचेही ऐकले पाहिजेत तरच तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर होईल अशी भूमिका त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर मांडली. त्यांना कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर अनेकांना तीव्र मानसिक धक्काही बसला होता. आता मात्र ते आजारपणातून बरे झाले असून, येत्या काही काळात पुन्हा रंगभूमीवर सक्रिय होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.