“…..अन् शारदाताई खळखळून हसल्या !”

0
69
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

समाजात आजही अनेकांच्या डोक्यावर अंधश्रध्देच भुत बसलेले आहे. काही केल्या ते उतरता उतरत नाही. समाजातील अंधश्रध्देच हे भूत उतरवण्याचे काम अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने केले जाते. दरम्यान, समितीच्यावतीने साताऱ्यातील मल्हारपेठेतील शारदाताई बाबर यांची आज सुमारे साडे तीन किलोहून अधिक जटांतून मुक्त करण्यात आले. जटामुक्त झाल्यानंतर शारदाताई यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

मल्हार पेठेत राहणाऱ्या शारदाताई बाबर यांच्या डोक्यावर गेली चार वर्षापासून जटा वाढत चालल्या होत्या. या जटा वाढण्यामागचे कारण म्हणजे शारदाताईंना देवाच्या जटा असल्याचे अनेकांनी डोक्यात बिंबवले. आणि त्यांनी त्या तशाच वाढवल्या. मात्र, वाढत गेलेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर सुमारे साडेतीन किलोपेक्षाही जास्त वजनाच्या या जटा झाल्या होत्या. परिणामी त्यांच्या मानेलाही त्रास होत होता. त्यांना एकाच अंगावर झोपावे लागत असत आणि त्यामुळे त्यांचा खांद्यालाही वेदना होत होत्या.

त्याच्याबाबत माहिती समजल्यानंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुरेंद्र शिंदे यांनी शरदाताईंची भेट घेतली. तसेच त्यांनी आणि शारदाताईंच्या बहिण उषा वायदंडे यांनी शारदाताईंची समजूत काढली. शारदाताई या जटा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती डॉ. हमीद दाभोलकर यांना दिली. काही वेळातच अनिसची टिम मल्हार पेठेत दाखल झाली.

शारदाताई यांच्या सांगण्यानुसार मला डोक्यावरचे सर्वच केस काढायचे आहेत असा अट्टाहास धरल्यानंतर त्यांना जवळच्याच केशकर्तनालयात नेण्यात आले आणि त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस काढण्यात आले. त्यांच्या डोक्यावरचे केस काढल्यानंतर त्यांनी खदखदून हसत आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे सांगितले. आणि त्यांनी हात जोडून अनिसचे आभारही मानले. यावेळी अनिसच्या वंदना माने, डॉ. दिपक माने, सुरेश शिंदे, संतोष साळुंखे हे उपस्थित होते.

जटाधारी महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा – डॉ. हमीद दाभोलकर

दरम्यान, त्रास होत असताना त्या कोणाला सांगायलाही धजावत नाहीत कारण समाज काय म्हणेल या विचारात ती महिला हे डोक्यावरच ओझ तसच घेऊन आयुष्य जगत असते. त्यामुळे अशी जट असलेल्या महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ हमीद दाभोलकर आणि सौ वंदना माने यांनी केले आहे.

जटा वाढण्याचे कारण

केस वेळचेवेळी न धूणे, न विंचरणे, त्याची निगा न राखणे या कारणातून जटा वाढत असतात. आणि जेंव्हा केसांचा गुंता तयार होतो तेंव्हा त्या एकमेकाला चिटकून रहातात आणि लोक त्याला देवाची जटा असे सांगून त्याची देवपूजा करायला सुरवात करतात. समाजातील या अंधश्रध्देच्या पायात अनेक महिलांच्या डोक्यावर तीन किलोच्या वरती आणि सुमारे 10-12 किलोची जट तयार होते. आणि याचा त्रास त्या संबधित महिलेला होत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here