पुणे | पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी या तरुणानं केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात सध्या राजकीय गदारोळ सुरु आहे. शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात केले. भुजबळ हे नाशिककर म्हणून ९४ व्या संमेलनाचे आमंत्रण नियोजित संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर यांना द्यायला पुण्यात आयुका येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उस्मानी बाबत वरील वक्तव्य केले.
तसेच मत प्रदर्शित करण्याचा अधिकार असला तरी कुठल्या धर्माला, जातीला थेट टार्गेट करणं चुकीचं आहे,अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली. त्याचबरोबर शेतकरी आंदोलन नरेंद्र मोदी सरकार चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.शेतकरी हा आपला दुश्मन नसून तो आपला अन्नदाता आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुण्यात ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी यानं भाषण केलं होतं. त्यावेळी त्यानं हिंदू समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली होती. ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, असं तो म्हणाला होता. त्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. शर्जिलवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं पत्रच लिहिलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.