‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार- मुख्यमंत्री शिंदे

eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेकजण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. या योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ देण्यात येत आहे.

‘लेक लाडकी’ सारखी योजना प्रथमच सुरू करण्यात आली आहे. महिलांना एसटी बस प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या असल्याने त्यांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचल्यास जनतेच्या समस्या कळू शकतात. ही योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

श्री.शिंदे पुढे म्हणाले,शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करताना मंत्रिमंडळ बैठकीत ३०० पेक्षा अधिक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. अल्पावधीत २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘नमो शेतकरी’ योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात ६ हजार रुपये देण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. सामान्य माणसालाही मुख्यमंत्र्याला भेटावेसे वाटते हा विश्वास शासनाविषयी निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यासाठी २ हजार ४५ कोटींचा निधी विकासकामांसाठी शासनाने दिला आहे, असे त्यांनी सांगितले. डोंगरी विकासाच्या २०० कोटींच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना जनतेला समजावून सांगाव्यात आणि त्यांचा लाभ त्यांना द्यावा या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलतीची योजना सुरू केली. याचा मोठ्या प्रमाणात लाभ नागरिकांना झाला. जलयुक्त शिवार योजना नव्याने सुरू करण्यात आली. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सामान्य शेतकऱ्याला उभे राहता आले. दुधाळ जनावरांचे अनुदान वाढविण्यात आले, सातबारा ऑनलाईन देताना डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध झाला, ६०० रुपये ब्रास दराने वाळू, १०० रुपयात आनंदाचा शिधा अशा अनेक जनकल्याणकारी योजना शासनाने सुरू केल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. ते म्हणाले, शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचावे. शासनाने निर्णय घेतल्याने भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढ्यांना लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार शहाजी पाटील यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे गजानन पाटील यांनी अभियानाची माहिती दिली. लाभार्थ्यांना एखाद्या योजनेचा लाभ तात्काळ देण्यासाठी ८ हजार योजनादूत सातारा जिल्ह्यात योजनांची माहिती देत आहेत. त्यामुळे १ लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील २५ हजार ६९९ पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, कृषी, महिला बाल कल्याण, रोजगार यासह १७ विभागाकडील योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना देण्यात आला. महसूल व सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वाटपही यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.

अभियानाद्वारे तहसिल कार्यालय पाटणकडून १० हजार १५१ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. तसेच पंचायत समिती पाटणकडून ९ हजार ३७१, वेल्फेअर बोर्ड साताराकडून १ हजार ५५१, तालुका कृषी अधिकारी पाटण यांच्याकडून १ हजार २९५ , तहसिल कार्यालय कराडकडून १ हजार २३२ यासह प्रांत कार्यालय पाटण, तालुका कृषी अधिकारी कराड, नगर पंचायत पाटण, महावितरण, वन विभाग, दुय्यम निबंधक, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा रुग्णालय कराड यांच्यामार्फत लाभार्थींना लाभ देण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.शिवाजीराव देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभवस्तू व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्हा दिव्यांग सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, शहाजी पाटील, अनिल बाबर, प्रकाश आबीटकर, माजी आमदार नरेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.