व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ!! राष्ट्रवादी आमदाराच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही महिने राहिले असतानाच आता सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. त्यामुळे शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ऋषीकेश शिंदे यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख मा. नगरसेवक किशोर पाटकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. साताऱ्याने राष्ट्रवादीला अनेक मोठे नेते आणि मंत्री दिले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची ताकद साताऱ्यात वाढली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्याना पक्षात घेऊन भाजप शिवसेनेने साताऱ्यात आपली पकड मजबुत केलं आहे. त्यातच आता तर थेट आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकेश शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.