मेढा प्रतिनिधी | सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आता जावलीत “प्लॅन बी “ नियोजित केला आहे. शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाल्यानंतर ते बऱ्याच दिवसांनी साताऱ्यात परत आले आहेत. शशिकांत शिंदेंचा मूळ भाग असलेल्या जावली तालुक्यावरील आपली पकड मजबूत करण्याकरीता शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. याऊलट जावलीत आमदार शशिकांत शिंदे यांनीदेखील शिवेंद्रराजेंना चेकमेट देण्याकरीता यंत्रणा राबवायला सुरवात केली आहे.
भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी जावलीत “प्लॅन बी “ सुरु केल्याने भविष्यात या भागातील राजकीय गणितं बदलणार का ? याबाबत लोकांमध्ये कुतुहुल निर्माण झालं आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या एकूण कारकिर्दीचा विचार करता ते सदैव सबुरीची अन् जमेची राजकीय गणितं मांडत असतात. समाजकारणाला प्राधान्य देत राजकारण करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावलीची जबाबदारी लिलया पार पाडताना केली आहे. मात्र आता त्यांचे विश्वासू कार्यकर्ते आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी गेल्याने सातारा-जावलीच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सुहास गिरी यांचं काम पाहून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना वेळोवेळी राजकीय संधी दिली होती. त्यांना राजकारणात पुढे नेण्याचं कामही बाबराजेंनी केलं. मात्र आता शिवेंद्रसिंहराजे यांना टांग देवून सुहास गिरी आ. शशिकांत शिंदे यांच्या स्वागताला गेल्याने जावलीची राजकीय गणितं बदलणार का याविषयी चर्चा रंगू लागली आहे. राजकीय गणितं जुळवण्यात माहिर असलेले शिवेंद्रसिंहराजे आता या पटावर खेळताना कोणती प्यादी बाहेर काढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कोरोना संकटाच्या काळात सातारा-जावली मतदारसंघात राजकीय गणितांच्या जुळवा -जुळवीमुळे वेगळीच रंगत आली आहे एवढं मात्र खरं..!!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in