सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
रणसिंगवाडी येथील विविध विकासकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “रणसिंगवाडी व वेटने गावातून जाणाऱ्या जिहे कटापुर योजनेच्या अंतर्गत आंधळी बोगदाच्या योजनेचा सर्व्हे करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 16 लाख मंजूर केले आहेत. या दोन्ही गावांना पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिपादन केले.
रणसिंगवाडी येथील विविध विकासकामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, बाळासाहेब इंगळे, सागर साळुंखे,राजेंद्र कचरे, जोतिनाना सावंत, संतोष साळुंखे, तुकाराम यादव, युवराज बिटले, ज्ञानेश्वर जगताप सरपंच सुखदेव रणसिंग,उपसरपंच विठ्ठल मसुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार शिंदे म्हणाले कि, रणसिंगवाडी गावाने कायम राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली आहे. रणसिंगवाडी बुध मुख्य रस्ता डांबरीकरणासाठी 42 लाख, साकव पूलासाठी 30 लाख, अंतर्गत रस्ता कामासाठी 10 लाख यासह विविध विकास कामाचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी सरपंच सुखदेव रणसिंग म्हणाले की, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चांगले काम करत आहे. गावच्या विकासासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. गावाला जिहे कटापूर योजनेचे पाणी मिळावे व या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती.