बाबा आमटेंची नात शितल आमटे यांची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर | डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.

डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.