हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये अनेक प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. त्यापैकी काही हटके तर काही वादग्रस्त असतात. सातारा जिल्हयातील शेणोली, ता. कराड या गावच्या यात्रेची आता अशाच वेगळ्या कारणाने चर्चा होत आहे. तीन वर्षांनी येणारी अकलाईदेवीची (१२ बकऱ्यांची) जत्रा येत्या २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बोर्डवर चक्क बोकडामागे १ हजार रुपये वर्गणी जमा करण्याचे आवाहन केले आहे. सध्या सगळीकडे शेणोली गावची जत्रा आणि बोकडांच्या वर्गणीचीच चर्चा आहे.
‘गावची जत्रा अन् कारभारी सतरा’
साताऱ्यातील तरूणांनी लॉकडाऊनच्या काळात ‘गावची जत्रा कारभारी सतरा’, नावाच्या वेबसिरिजची निर्मिती केली. सोशल मीडियावर ही वेबसिरिज तुफान लोकप्रिय झाली. सध्या अशाच एका जत्रेची सगळीकडे चर्चा ऐकायला मिळत आहे. ‘गावची जत्रा म्हटलं की कारभारी सतरा, हे समीकरण आलंच. अशीच तर्हा कराड तालुक्यातील शेणोली गावच्या जत्रेच्या निमित्ताने झाली आहे. शेणोली गावच्या अकलाईदेवीची २८ नोव्हेंबर रोजी जत्रा आहे. ही जत्रा तीन वर्षातून एकदा येते. १२ बकऱ्यांची जत्रा, असं या जत्रेला म्हटलं जातं.
ग्रामपंचायतची झाली यात्रा कमिटी
शेणोली (ता. कराड) या गावच्या अकलाईदेवी जत्रेचं सध्या नियोजन सुरू आहे. गावची जत्रा म्हटलं की कमिटी आली. ही कमिटी जत्रेचं नियोजन करत असते. परंतु, शेणोली गावात ग्रामपंचायतीची बॉडीच जत्रेच्या कमिटीचं काम करत आहे. १२ बकऱ्यांच्या जत्रेसाठी प्रत्येक बोकडामागे १ हजार रुपये वर्गणी द्यायची असल्याचे ग्रामपंचायतीच्या फलकावर लिहिले आहे. त्यावरून हा फलक वादाचा विषय ठरला आहे.
ग्रामपंचायतीची भूमिका सापडली वादात
महात्मा फुले यांची कर्मभूमी भूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपणीचे शिक्षण, सत्यशोधक विचारांचा वारसा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना, क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिसरकारची चळवळ, अंधश्रद्धेच्या विरोधातील प्रबोधन, मार्क्सवादी विचाराने काम केलेले रेठरे बुद्रुकचे यशवंतराव मोहिते, असा उत्तुंग वारसा असलेल्या कराड तालुक्यातील शेणोली गावात अशा प्रकारे बारा बकऱ्यांची जत्रा, तीही ग्रामपंचायतीने फलक लिहून जाहीर करावी आणि अर्थातच हे सगळे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी असावे, यामुळे ही जत्रा आणि ग्रामपंचायतीने केलेले आवाहन वादात सापडले आहे.
ग्रामपंचायतीवर कारवाईची अंनिसची मागणी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या जिल्ह्यात होऊन गेले. जादूटोणा विरोधी कायदा तयार केला गेला, अशा सातारा जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बोकडांचे बळी दिले जाणार आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून जत्रेतल्या बोकड बळीला प्रतिबंध आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंनिसचे कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी केली आहे.