कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मेंढरे पाण्यावर घेऊन जात असताना तुम्ही आमच्या शिवरात मेंढ्या घेऊन कशाला आला असे म्हणून चिडून जाऊन मेंढपाळावर एकाने कुर्हाडीने मारहाण करून त्याला जखमी केले. साळशिरंबे येथील तलावाजवळ बुधवार (दि. 21) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद लक्ष्मण बापू यमगर यांनी दिली आहे. याप्रकरणी एकावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष विठ्ठल काकडे (रा. साळशिरंबे, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर इराण्णा बापू यमगर (वय 15, रा. अकुळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, सध्या रा. जिंती, ता. कराड) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मण यमगर यांचा मेंढपाळ व्यवसाय असून ते आपल्या गावाहून जिंती येथे मेंढरे चारण्यासाठी आले आहेत. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचा लहान भाऊ इराण्णा हे दोघेजण मेंढरे चरण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास साळशिरंबे येथील तलावावर मेंढरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना तू आमच्या शिवारात मेंढरे घेऊन कशाला आला, तुम्ही येथून मेंढरे घेऊन जावा तसेच त्याने शिवीगाळ दमदाटी करत इराण्णाला कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संतोष काकडे यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा