राज्यातील सत्तांतर पैसे घेऊन, माझ्याकडे पुरावे; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केले. राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र राज्यातील हे सत्तांतर पैसे घेऊन झाले आहे, आपल्याकडे याचे पुरावे असून सिद्ध न झाल्यास आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
नितीन देशमुख यांचाही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये समावेश होता, मात्र तेथून ते परत मुंबईला परतून त्यांनी उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा दर्शवला होता. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होते. पैसे घेऊन सत्तांतर घडवण्यात आलं आहे. याबाबत माझ्याकडे पुरावे असून हे सिद्ध न झाल्यास आत्महत्या करेन.
उद्धव ठाकरे भेटत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती असे काही नेते सांगतात. ज्यांनी निष्ठावंतांचा आव आणला होता, त्यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजर खुपसला आणि सत्तांतर घडवलं. माझ्याकडे त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स आहेत. पैशाने सत्तांतर झालं हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन असेही नितीन देशमुख यांनी सांगितले.