सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने साताऱ्यात शुक्रवारपासून (ता. 17) ते सोमवार (ता. 20) दरम्यान शिवजयंती महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात शस्त्र प्रदर्शन, अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव, शाही मिरवणूक व व्याख्यान असे कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
या वर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “शुक्रवारी (ता. 17 फेब्रुवारी) प्रतापसिंह हायस्कूल येथे ऐतिहासिक व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत आयोजित केले आहे. हे प्रदर्शन विनाशुल्क असेल. शनिवारी (ता. 18) अजिंक्यतारा किल्ला येथे मशाल महोत्सव होईल. यावेळी गड पूजन व श्री मंगळाईदेवी आरती होईल. या मशाल महोत्सवात सर्व शिवप्रेमी युवक, संघटना व नागरिकांनी सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे. रविवारी (ता. 19) शिवजयंती दिनी सायंकाळी चार वाजता शाही मिरवणूक राजवाड्यापासून निघेल.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1233162184303403/
सोमवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता गांधी मैदानावर वारकरी संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे, देहू यांचे व्याख्यान होईल, तसेच शिवजयंती महोत्सवात सुंदर देखावे मिरवणूक स्पर्धा होणार असून, यामध्ये अनुक्रमे 25 हजार, 15 हजार, सात हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या शिवजयंती महोत्सवात सर्व शिवप्रेमी व सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.