रामदास कदमांचा शिवसेनेकडून “हरामदास” उल्लेख करत निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शिवसेना कराड दक्षिण तालुक्याच्या वतीने “हरामदास” असा उल्लेख करीत रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला. शहरातील दत्त चाैक येथे शिवसेनेच्या वतीने “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले. रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व ठाकरे कुटुंबीयांवर जे बेलगाम, बेताल अशोभनीय वक्तव्य केले होते. शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे जाहीर निषेध करण्यात आला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद- पाटील म्हणाले की, रामदास कदम यांना 32 वर्षे आमदारकी, 10 वर्षे मंत्रीपद, 4 वर्षे विरोधी पक्षनेतेपद आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाले. तरीही उपकाराची जाणीव न ठेवता खाल्ल्या मिठाला न जागता चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. आगामी निवडणुकीत शिवसैनिक व जनता त्यांना जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. शिवसेना कराड शहर, तालुका व जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत व धिक्कार करीत आहोत.

यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका अनिताताई जाधव यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा धिक्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कराड दक्षिण तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, युवा सेना शहर संघटक अक्षय गवळी, उपतालुका प्रमुख दिलीप यादव, शहाजीराव जाधव ,संजय चव्हाण, माणिक आतारकर, ऋषिकेश महाडिक, महिला आघाडीच्या कविताताई यादव, शोभाताई लोहार विभाग प्रमुख प्रवीण लोहार,अनिल चाळके, महेश भावके, ओमकार काशीद पाटील आदी शिवसैनिक, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.