कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा शिवसेना प्रमुखपदावरून आता उध्दव ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने पहायला मिळणार आहे. खरी शिवसेना व पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या यावरून दोन्ही गटात राज्यभर चढोअोढ सुरू आहे. आता सातारा जिल्हा प्रमुख पदावर हर्षद कदम यांच्या नियुक्तीनंतर जयवंत शेलार यांचीही त्याच पदावर निवड झाल्याचे पत्र समोर आले आहे.
शिवसेनेतील फूटीनंतर पाटण विधानसभा मतदार संघाचे आ. शंभूराज देसाई यांनी बंडखोरी केली होती. आ. देसाई यांचे विश्वासू असलेले जयवंत शेलार हे जिल्हा प्रमुख पदावर होते. काही दिवस श्री. शेलार यांनी आपण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर श्री. शेलार पदावरून हटवून मुख्य संघटक पद दिले आणि हर्षद कदम यांना जिल्हा प्रमुखपद दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या दाैऱ्यात श्री. शेलार यांनी दांडी मारली होती. त्यानंतर ते मंत्री शंभूराज देसाई गटात दिसू लागले होते.
आता जयवंत शेलार यांचे शिवसेना प्रमुखपदाचे पत्र समोर आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केल्याचा फोटोही काढला आहे. या पत्रात म्हटले आहे की, कराड उत्तर व दक्षिण आणि पाटण कार्यक्षेत्रावर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे.