कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांना अटक केल्यानंतर राज्यभर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने धरणे आंदोलने करत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याचे पडसात कराड येथेही उमटले असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे कराड तालुका अध्यक्ष नितीन काशीद म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीचा सामना करत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा गाडा अत्यंत वेगाने विकासाकडे जात होता. परंतु गेल्या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून हे सरकार पाडण्याचा आतोनात प्रयत्न केला. तसेच भाजपकडून अहोरात्र प्रयत्न केले जात होते, असा या आरोप काशीद यांनी केला.
यावेळी राज्यपालांवरही काशीद यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे घटनाभाह्य वर्तन करत आहेत. त्यामुळे राज्यापालांच्या राज्यघटनाविरोधी वर्तनाचा कराड तालुक्यातही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपती यांना विनंती करत आहोत कि त्यांनी केंद्र सरकार व राज्यपालांनासुद्धा योग्य ते निर्देश दयावेत. आणि लोकशाही वाचहवण्यासाठी राष्ट्रपतींनी योग्य ती पाऊले उचलावीत, अशी मागणी काशीद यांनी केली.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कराड येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर धरणे आंदोलन करत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.