औरंगाबाद | गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यामुळे भाजप सरचिटणीस गोविंद केंद्रे यांना मंत्री भूमरे यांच्या कार्यालयात नेऊन मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रा. गोविंद केंद्रे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गारखेड़ा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी काही शिवसेनेचे गुंड बोलावून भूमरे यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली. यात प्रा. केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनीच गुंडगिरी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत असून औरंगाबादमध्ये ही याची प्रचिती पुन्हा दिसून आली, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
तर, गारखेडा येथील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात चहा पिण्यासाठी शिवेसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि प्रा. गोविंद केंद्रे आणि इतर आले होते. यावेळी प्रा. केंद्रे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यातून एकाने त्यांना खाली पाडले. यानंतर प्रा. केंद्रे यांना जंजाळ यांनी स्वतः उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे.