औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण औरंगाबाद शहरातील जवळपास 50 हजार घरांवर शिवसेनेचा ध्वज फडकवण्याचे ध्वज दिवाळी अभियान आजपासून सुरु झाले. शहरतील अमरप्रीत चौकातून आज या मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे उपस्थिती होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेने व्यापक प्रचार मोहीम हाती घेतली असून 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत पन्नास हजार घरांवर भगवा फडकवणार आहेत. याद्वारे जागतिक विक्रम करण्याचा त्यांचा निश्चिय आहे. 4 नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाटेला घाटी रुग्णालय परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांना अभ्यंगस्नान घातले जाणार आहे. तसेच 6 नोव्हेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी आकाश दिव्यांच्या धर्तीवर विकास दीप लावले जाणार आहे. शहरातील विविध विकास कामांची उद्घोषणा या विकासदीपांद्वारे करायची, अशी शिवसेनेची योजना आहे.
यानिमित्ताने शहरात 200 विकास दीप लावले जातील. तसेच 7 नोव्हेंबर रोजी महिला आघाडीच्या वतीने कोरोना योद्ध्यांसोबत भाऊबीज साजरी केली जाणार आहे. 14 नोल्हेंबर रोजी तापडिया नाट्य मंदिरात ‘मी सावरकर बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.