कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख एक धडाडीचा व आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोहिते (वय- 55 रा. कोयना वसाहत, कराड) यांचे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.
संजय मोहिते यांना आज पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सूरू होते. मात्र, काही वेळातच त्याचे निधन झाले. शिवसेनेचे चंद्रकांत पवार, अशोक भावके नंतर गत महिन्यातच सेनेचे उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक यांच्या निधनाने शिवसेना पक्षातील सातारा जिल्ह्यातील जुणेजाणते शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आज संजय मोहिते यांचे निधन झाले. संजय मोहिते यांच्या निधनाने शिवसेनेच्या शिवसैनिकांच्यात दुखाःची छाया दिसून आली.
संजय मोहिते यांनी कराड शहरसह जिल्हा पदापर्यंत काम केले. शिवसेनेचे नेते व विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. संजय मोहिते यांनी आक्रमकपणे कराड शहरात शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने, मोर्चे काढले होते. गेली 25 वर्षेहून अधिक काळ मोहिते यांनी शिवसेनेत आक्रमकतेने काम केले. सेनेच्या दुसऱ्या फळीतील एक आक्रमक व धडाडीचा यूवा कार्यकर्ता म्हणून त्यांची अोळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले असा परिवार आहे.