हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून आपण हा निर्णय घेतला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्यांनी विनंती केली. आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. त्यांना पाठिंबा दिला तर बरं होईल. त्यांच्या आग्रहाखातर शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. शिवसेनेनं याआधीही पक्षीय मतभेद बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना कधीच कोत्या मनानं वागलेली नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी द्रौपदी मुर्मू याना पाठिंबा द्यावा अशी मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत सूचक विधान केलं होत त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होत. अखेर त्यांनी द्रौपदी मुर्मू याना पाठिंबा दिला आहे.