सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. साताऱ्यात दोन्ही घरातील संघर्ष सर्वश्रूत असून तो राज्यभरात माहिती आहे. शिवजयंतीला पोवई नाक्यावर असलेल्या शिवतीर्थावर महाआरती दोनवेळा पार पडली. त्यामुळे आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शनही दिसून आले.
साताऱ्यात छत्रपती खा. उदयनराजे भोसले आणि छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा संघर्ष गेले अनेक वर्षांपासून सातारा जिल्हा नाहीतर पूर्ण महाराष्ट्र पाहत आला आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ही दिसून आला. छत्रपती घराण्यांना एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या थाटात पार पाडता आली असती. मात्र, दोन्ही भावांचे राजकीय हेवेदावे समोर आले आणि एकाच शिवतीर्थावर दोन वेळा महाआरतीचे आयोजन करण्यात आलं.
छत्रपती राजमाता कल्पनराजे भोसले यांनी पहिली महाआरती केली. त्यानंतर छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांचे समर्थक यांनी शाही मिरवणूक काढून शिवतीर्थावर महाआरती केली. दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असूनही हे एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का केली नाही. येत्या नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन्ही राजेंनी आपले शक्तिप्रदर्शन केले का? यावर सातारकरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.