हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा असा कसा काय पडला असा सवाल करत महाराजांच्या पुतळा निर्मातीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशीची समितीची स्थापना केली होती. अखेर या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा कोसळला याचे कारण या अहवालात समोर आलं आहे.
भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. या समितीने आज आपला अहवाल सादर केला आहे. चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पुतळ्याला गंज लागला होता असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. एकूण १६ पानांच्या या अहवालात पुतळा कोसळण्याची अनेक कारणे सांगण्यात आली आहे. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात म्हटले आहे. शिवरायांच्या पुतळ्याची देखभाल चांगल्या पद्धतीने करता आली नाही. तसेच ज्याप्रकारेशिवरायांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आले नव्हते असेही या अहवालात म्हंटल आहे.
दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम शिल्पकार जयदीप आपटेकडे देण्यात आलं होतं. तर पुतळा आणि पायासाठी संरचना सल्लागार म्हणून चेतन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. तर आतामालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही अशी माहिीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.