Shivani Surve : ‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर; नव्या मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivani Surve) ‘देवयानी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वेने मुख्य भूमिका साकारत अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाचं प्रेम मिळवलं. यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं. ‘वाळवी’, ‘सातारचा सलमान’ अशा चित्रपटांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या. यानंतर आता तब्बल ९ वर्षानंतर शिवानी पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करताना दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकेतून शिवानी पून्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.

नवी मालिका

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या या नव्या मालिकेचे नाव ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ असे आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे ही तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये शिवानीच्या भूमिकेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. (Shivani Surve)या मालिकेत मानसी सणस नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. हुशार, प्रामाणिक आणि स्वाभिमानी मानसी आपल्या वडिलांची लाडकी आहे. त्यांनी घेतलेली कष्टामुळे आपण मोठे होत आहोत याची जाणीव ठेवून जगणारी मानसी वडिलांचं स्वप्न पूर्ण करू पाहतेय.



मानसीच्या आयुष्यात तिला प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे तिच्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडम. त्यांच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण, आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावापुढे मानसीचा निभाव लागेल का? मानसी पदवी परिक्षेत टॉप करून गायत्रीचा रेकॉर्ड मोडते जे गायत्रीला पचत नाही. त्यामुळे मानसीला टोचून बोलायची संधी ती सोडत नाही. पण मानसीला नाती जोडून माणसं जवळ करायला आवडतात. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त स्वतःचा विचार करायचा नाही. नातं परिपूर्ण करायला ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ असावं असं मानसीला वाटतं. अशी ही गोष्ट लवकरच आपल्या भेटीस येत आहे.

शिवानी सुर्वेची प्रतिक्रिया (Shivani Surve)

अभिनेत्री शिवानी सुर्वे या मालिकेतून तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकणार आहे. याबाबत बोलताना तिने म्हटले, ‘स्टार प्रवाह कुटुंबाबरोबर पुन्हा एकदा जोडली जातेय याचा मला आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे’.

कधी सुरु होणार?

स्टार प्रवाहची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवीन मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता सुरु होत आहे. (Shivani Surve) तर ही मालिका सुरु होताना ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.