सातारा | कदाचित त्यांनी भ्रष्टाचार करुन मोडकळीत काढलेल्या जनतेच्या सहकारी संस्था आणि जनतेच्या कारखान्यात केलेला भ्रष्ट कारभार यांना शांत बसू देत नसावा, म्हणूनच इतकी आगपाखड ते करत आहेत. तुमच्याबाबतीत काहीच कोण बोलले नाही तर बुडाला आग लागण्याचे कारणच नव्हते. त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरुन निश्चितच दाल मे कुछ काला है हे सिध्द झाले आहे. आता यांनी पदाच्या जोरावर दबवून ठेवलेल्या मालक सभासदांनीच, स्वतःला न्याय मिळवण्यासाठी यांचा समाचार घ्यावा, असेही खा. उदयनराजे यांनी आ. शिवेंद्रराजेंना प्रसिद्धी पत्रकाद्वारे टोला लगावला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सहकाराच्या तत्त्वांना तिलांजली देत काही संस्था कशाप्रकारे गिळंकृत केल्या गेल्या याची वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले त्याबाबत वाच्यता केली. यामध्ये कोणत्या कारखान्याचा किंवा आमदारांचा नामोल्लेख नव्हता. परंतु, खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे उदयनराजे कोण? असा प्रतिप्रश्न ते करत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. त्यामुळेच त्यांनी गरळ ओकली आहे.
सहकारी संस्थांतील सभासद मालक असूनही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापेाटी त्यांची पिळवणूक केली जाते. अशा सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार बाहेर काढणार. सहकारी संस्थांचे जे खरे मालक आहेत त्यांनी आपल्या मालकी अधिकारांचा वेळीच वापर करुन अशा स्वाहाकारी आणि स्वार्थी विचारधारेच्या व्यक्तींकडून संस्था खाजगीकरण होण्यापूर्वी सभासदांनी ताब्यात घ्याव्यात, असे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य फक्त आणि फक्त यांनाच झोंबले. वास्तविक या वक्तव्यावर आगपाखड करण्याचे कारण नव्हते, असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.
व्यक्तीगत किंवा संस्थेचे असे कोणतेही नांव घेतले नसताना त्यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. याचाच दुसरा अर्थ दाल मे कुछ काला नव्हे तर शायद सब कुछ काला है हे सातारकरांच्या लक्षात आले आहे. त्यांची आगपाखड, कोल्हेकुई, गरळ त्यांची त्यांना लखलाभ असो. काहीही झाले तरी यांच्याकडून दबवल्या गेलेल्या आणि पिचवलेल्या गेलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम एक समाजसेवक म्हणून आम्ही करुन देणार आहे. तसेच यापुढील त्यांच्या बालिश वक्तव्याची दखल घेणे प्रशस्त वाटत नाही. झालेल्या व केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सरळ जनतेपुढेच सत्य मांडू, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले आहेे.
ग्रेड सेपरेटरचे काम मी पूर्ण केले हे त्यांच्या तोंडाने सांगितले ते बरे झाले. सातारा शहराची पुढील 20-25 वर्षाची वाहतूक लक्षात घेवून, ग्रेडसेपरेटरचे काम केले या पाठिमागे दूरदृष्टी आहे. संकुचित दृष्टीच्या व्यक्तींना त्याचे आकलन होणारे नाही. सातारा शहरातील वाहन किंवा गोडोलीकडून येणारी वाहन किंवा बसेस या मार्गातून स्टँडकडे जात आहे. स्टँडकडून गोडोली आणि जिल्हा परिषद या मार्गाचाही चांगला वापर होत आहे. भविष्यात योग्य ती खबरदारी घेवून ग्रेड सेप्रेटरमधून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. या पाठिमागे लोकांची सोय ही लोकहिताची भूमिका आहे.
शिवतीर्थावरची कोंडी संपुष्टात आली आहे. श्रेय घेण्याचा त्यांचा हावरटपणा सातारकरांना नवीन नाही. ग्रडसेपरेटरचे श्रेय मिळाले नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट होत आहे. त्यांच्या ग्रेडसेपरेटरच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडंतरी समाधान मिळत असावे. तसेच भ्रष्टाचार्यांनी नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारावर बोलणं चोरांच्या उलटया बोंबा आहे त्यात तथ्य काही नाही, असेही ते म्हणाले.