सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
आता एक फॅशन झाली आहे. साताऱ्यात नव्हे तर जिल्ह्यात एखादं काम आलं, तर मीच केलं. अन् कामं झाली नाहीत की बाकीचे लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत असा ठरलेला डायलॉग आहे. नशीब सातारकरांना ऑक्सिजन ही उदयनराजेंमुळे येतोय असं ऐकायला मिळत नाही, असा खोचक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
जिल्हा नियोजन समिती विकासकामाच्या श्रेयवाद सध्या साताऱ्यात दोन्ही राजेंच्यात सुरू आहे. नगरोत्थान मधून आलेला निधी माझ्यामुळेच आल्याचे सांगत आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अदालतवाडा असेल किंवा शाहू नगरची योजना असेल, कासला राज्य सरकारकडून अजितदादा असताना पहिली मंजुरी घेतली होती. अमृत योजना ही सुद्धा योजना प्रशासकाच्या काळात गेली. सातारा विकास आघाडीची सत्ता असतानाही योजना केली नाही. यामध्ये सर्वात जास्त वाटा राज्य सरकारचा आहे आणि मी आमदार म्हणून सरकारमध्ये काम करत आहे. मी आमदार म्हणून प्रयत्न केल्यामुळेच हे कामे झाले आहेत.
आ. भोसले म्हणाले, मी स्वतः डीपीडीसीला हजर असतो. त्यामधून ही कामे मंजूर झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व पालिकांना नगरोत्थान मधून निधी वाढवून द्यावा, अशी वेळोवेळी मागणी केली आहे. कामे मंजूर होण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचा काय विषयच येत नाही.