सातारा | परळी खोऱ्यात राष्ट्रवादीने आयोजिलेल्या मेळाव्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आता आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील राजकीय वाद पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
परळी खोऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. शशिकांत वाईकर आणि कार्यकर्त्यांनी हातावर घड्याळ बांधल्याने शिवेंद्रसिंहराजेंसह भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार शशिकांत शिंदे व दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भोंदवडे या गावात पार पडलेल्या मेळाव्यात हा प्रवेश घेण्यात आल्याने परळी भागातील राजकीय समीकरण बदलणार का याकडे आता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे. या प्रवेशामुळे शिवेंद्रसिंहराजे यांची एक हाती सत्ता असणाऱ्या या भागात आता समोर शशिकांत वाईकर यांच्यासारखा तरुण चेहरा विरोधक म्हणून उभा राहिल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाला आत्मपरीक्षण करावे लागेल असे बोलले जात आहे, मात्र येणारी वेळ ते ठरवेल असेही बाबा समर्थक सांगत आहेत.