हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव अस म्हणल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यातच संतोष परब मारहाण प्रकरणी नितेश राणे यांच्या वर अटकेची टांगती तलवार असून राणे सध्या अज्ञातवासात आहेत. हाच धागा पकडून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. मांजराचा आवाज काढणारे आज मांजरा सारखे लपून बसले आहेत असा टोला त्यांनी लगावला.
दिपक केसरकर म्हणाले, जे लोक दुसऱ्यांना चिडवत असतात, त्यांच्यावर अशी वेळ ईश्वर कधी ना कधी आणत असतो. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत. ते वाघाला घाबरून की कोर्टाला घाबरून लपून बसले माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना बघून घाबरतात ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले.
जर कोणी चुकीचं वागत असाल तर कायदा सर्वांसाठी समान आहे. केंद्रीय मंत्री आहात म्हणून मुलाला वाचवणार अशी भूमिका घेत असतील तर उत्तर प्रदेश मधील मंत्र्याच्या पुत्राला वाचवताना काय झालं ते पाहावं, मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय उद्रेक होते हेदेखील लोकांनी पाहिलं आहे.अस म्हणत त्यांनी नारायण राणे यांना टोला लगावला.