हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु राज्यात सात जागा जिंकून देखील भाजपने शिंदे गटातील फक्त एका नेत्याकडे राज्यमंत्रीपद दिले आहे. याचीच खदखद शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून बाहेर आली आहे. शिंदेसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barane) शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नुकत्याच त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
माध्यमांशी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की, “शिवसेना भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. आमचे सात खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी माफक अपेक्षा होती. पण आमची अपेक्षा पूर्ण झाली नाही. भाजप पेक्षा राज्यात शिवसेनेने कामगिरी चांगली केली. भाजपने राज्यात २८ जागा लढवल्या त्यातील फक्त ९ जागा जिंकल्या. आम्ही १५ जागांवर लढलो आणि ७ जागांवर आम्हाला यश मिळालं. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त चांगला आहे”
त्याचबरोबर, “आमच्यासोबत दुजाभाव झाला. इतरांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय देण्यात आला” अशी खदखद श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत पेटलेल्या ठिणगीचा काय परिणाम पाहायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, भाजपने जागा वाटप करताना मित्र पक्षाचा विचार केला नसल्याचे शिवसेनेला अधिक खटकले आहे, हे आता जाहीरपणे उघड झाले आहे.