सोलापूर प्रतिनिधी । शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निष्ठावंतांना डावललं म्हणून अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी केली होती. त्याचा समाचार आता शिवसेनेकडून घेण्यात येत आहे. या हकालपट्टीमधे मागील निवडणूक लढवलेल्या २ उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर शहर मध्यमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि मोहोळमधून मनोज शेजवाळ यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र बंडखोरांना बघून घेतलं जाईल, या आपल्या उक्तीला साजेशी कृती करून दाखवली आहे. शिवसेनेच्या हा हकालपट्टी सत्राने बंडखोरांचे बंड थंड होणार की अधिक तीव्र होऊन शिवसेनेला याचा फटका सहन करावा लागणार हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.




