कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला… ; सामनातून निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यंदाचा पावसाळा हा शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला आहे. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय? असा सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून सत्ताधारी भाजप- शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

गेले 10-12 दिवस राज्याच्या सर्वच भागांत पावसाचे धुमशान सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने भयंकर धुमाकूळ चालवला आहे. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीतून जी काही थोडीफार पिके वाचली होती ती आता हाता-तेंडाशी आली होती. मात्र, सुगीचा हंगाम सुरू झाला असतानाच राज्यभर सर्वत्रच ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले.

राज्यात यंदा सर्वाधिक पेरा झाला तो सोयाबीनचा. मात्र सोयाबीनचे हेच पीक आता पुरते नष्ट झाले आहे. परतीचा पाऊस एरवी रब्बी हंगामासाठी तसा उपयुक्त ठरत असतो. पण यंदा तो विध्वंसक बनून आला. परतीच्या सरी एक-दोन दिवस कोसळतील आणि पाऊस निरोप घेईल असे वाटत होते, मात्र निसर्गाच्या लहरीपणाने कहरच केला. सलग दुसऱ्या आठवडयातही सातत्याने पाऊस सुरूच आहे. पुन्हा पावसाचे थैमानही इतके राक्षसी आहे की शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. सततच्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतात पाऊलही ठेवता येत नाही.

पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कुठल्याही परिस्थितीत पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू अशी गर्जना राज्यातील ‘मिथे’ सरकारने केली होती. पोळा होऊन आता दीड महिना झाला तरी अजून कागदी घोडेच नाचवले जात आहेत. त्यात आता परतीच्या पावसाने शेतमालाची जी प्रचंड नासाडी झाली त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय? असा सवाल शिवसेनेने केला