तिघेही बंडलबाज, 420 चा गुन्हा दाखल करा; सामनातून सरकारवर घणाघात

shinde fadnavis ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही बंडलबाज आहेत. या बंडलबाजानी जनतेची फसवणूक करून मते घेतली व आता लोकांसमोर जायला तयार नाही. या तिघांवर 420 कलमाखाली गुन्हा दाखल केला पाहिजे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून घणाघात केला आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासने आणि आता हात वर करण्याची भूमिका यावर सामना अग्रलेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. बंडलबाज सरकारने शेतकऱ्यांना विषाची बाटली घेण्यासाठी तरी शंभर रुपयांचे कर्ज द्यावे असा टोलाही अग्रलेखाच्या शेवटी लावण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या त्रिकुटाने महाराष्ट्रात ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट नव्याने पडद्यावर आणला आहे. महाराष्ट्राच्या आठ कोटी जनतेला या तिघांनी बेमालूम बनवले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांना या तिघांनी हरताळ फासला आहे. निवडणूक प्रचारात शिंदे-फडणवीस यांनी जाहीर केले होते की, लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ. शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करू. या घोषणांमुळे बहिणी व भावांनी मते दिली. लाडक्या बेरोजगार भावांनाही आश्वासन दिलेच होते की, महिन्याला चार हजार रुपये खात्यात जमा करू. मात्र सत्तेत आल्यानंतर ‘आता ते शक्य नाही. योग्य वेळी बघू,’ असे या तिघांनी सांगून टाकले. या आश्वासनांवर काखा वर करून हे तिघे बंडलबाज महाराष्ट्रात फिरत आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी तीच फसवणूक झाली. उलट अजित पवार यांनी शेतकऱ्यांनाच आता दम भरला आहे. ‘31 मार्चच्या आधी कर्जाचा हप्ता भरा, थकबाकी भरा. नाहीतर जप्तीची कारवाई होईल,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. अजित पवारांना शेतकऱ्यांनी विचारले, ‘दादा, हे असे कसे म्हणता? कर्जमाफीचा वायदा तुम्ही लोकांनीच केला, मग आता मागे का जाता?’ यावर हे महाशय म्हणतात, ‘अरे वेड्या, माझ्या भाषणात तुम्ही कधी ऐकलं का कर्जमाफीचं? तुला माहितीय का, अंथरुण बघून हातपाय पसरायचे असतात.’ अजित पवारांचे ते विधान धक्कादायक आहे.

अजित पवार म्हणतात, कर्जाची थकबाकी भरा. दुसरे शिंदे म्हणतात, ‘लाडक्या बहिणींनो व कर्जदार शेतकऱ्यांनो, चिंता करू नका. हा लाडका भाऊ सर्व आश्वासने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही’ तर तिसरा एकदम गोलमाल उत्तरे देऊन सटकतोय. एवढ्यावरच हे बंडलबाज सरकार थांबलेले नाही. ‘खर्चावर नियंत्रण करा आणि फुकट अनुदान योजना बंद करा,’ असे थेट आदेशच सर्व सरकारी विभागांना देण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांचे हे परिपत्रक म्हणजे बंडलबाज तिघांनी जनतेच्या केलेल्या फसवणुकीवरील ‘सरकारी’ मोहोरच आहे. या फसवणुकीबद्दल या तिघांवर 420 कलमाखाली गुन्हा दाखल केला पाहिजे. जनतेची फसवणूक करून मते घेतली व आता लोकांसमोर जायला तयार नाही.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. बंडलबाज तिघांचे सरकार आल्यापासून हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडली. त्यांचा आक्रोश या बहिऱया सरकारच्या कानावर पडत नाही. कोणी कर्जाचा प्रश्न घेऊन दारात उभे राहिलेच तर ‘औरंगजेबाचे स्मरण करा, सर्व चिंता विसरून जाल. घरात कुदळ, फावडी असतीलच. ती घेऊन कबर खोदायच्या बेरोजगार हमीवर जा. हिंदुत्व धोक्यात आहे आणि तुला कर्जमाफी सुचतेय?’, असे सांगून शेतकऱ्यांनाच वेडे केले जाते असं सामनातून म्हंटल आहे. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर असल्याचा साक्षात्कार या बंडलबाजांना आता झाला. या फुकटेगिरीमुळे राज्यात आर्थिक अराजक माजेल असे त्यांना आता वाटते, मग शेतकरी कर्जमाफीची आश्वासने देताना त्यांनी भांग ढोसली होती काय? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.