हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आज शिवसेनेकडून देखील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभा मतदारसंघासाठी मंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून संदीपान भूमरे तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
खरे तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाल्यापासून छत्रपती संभाजीनगरसाठी शिवसेनेकडून कोणाला तिकीट देण्यात येईल याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज शिवसेनेने संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करून राजकिय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संभाजीनगर मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अंबादास दानवे इच्छूक होते. परंतु ठाकरे गटाने दानवे यांना डावलून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या बाजूने संदीपान भूमरे आणि ठाकरे गटाच्या बाजूने चंद्रकांत खैरे मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु 2019 साली चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघात पराभव झाला होता. तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा हे तिन्ही पक्ष आम्ही सामने लढताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे संभाजीनगर मतदारसंघात यावर्षी कोण बाजी मारत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.