कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
लक्झरीने शिवशाहीला धडक दिल्यानंतर शिवशाही पुढे जात असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर नांदलापूर तालुका कराड गावच्या हद्दीत पाचवड फाटा उड्डाणपूलाजवळ मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताप्रकरणी लक्झरी चालक चंद्रकांत बाबुराव कदम (रा. कदममळा, कुपवाड) याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शिवशाही बस चालक संतोष भीमराव ठोंबरे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, महामार्गावर रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात निघालेल्या लक्झरीने पुढे जात असलेल्या शिवशाही बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की शिवशाही बस त्याच्यापुढे जात असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अविचाराने व निष्काळजीपणे लक्झरी बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी लक्झरी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत जाधव करत आहेत.