सीमाप्रश्नी बोम्मई आक्रमक मात्र, शिंदे -फडणवीस गप्प का?; अजित पवारांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. ते अद्याप गप्प का आहे? कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत?,” असा सवाल करत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवार यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सांगतिलं होतं, आणि त्यांनीही मराठी भाषिकांना दिलासा देण्यासाठी, मदत करण्यासाठी तसा संदेश देण्याची गरज असल्याचं मान्य केलं होतं. आपण दोन्ही सभागृहात एकमताने ठराव करु सांगितलं होतं. पण अजून आपला ठराव आलेला नाही आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र एक इंच जागा देणार नाही असा ठराव करुन मोकळे झाले आहेत. मात्र, आपल्या येथे अध्याप ठरावही करण्यात आलेला नाही.

यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील गेल्या 32 वर्षांपासून सभागृहाचे सदस्य असून, त्याचं वागणं, बोलणं, कारकिर्द सर्वांनी पाहिली आहे. ते काही अध्यक्षांना निर्लज्जासारखं काम सुरु आहे म्हणाले नाही. मी पण 30-32 वर्षं काम करत आहे. अनेकदा आपण सरकारला काही लाज आहे की नाही म्हणत असतो. सरकार निर्लज्जासारखं वागत आहे अशी विधानं सभागृहात करण्यात आली आहेत. पण हे फार सोयीचं राजकारण करतात,” अशी टीका यावेळी पवारांनी केली.

‘भूखंड-श्रीखंड’ प्लॅनिंग हे भाजपचेच : पवार

नागपूर येथील ज्या भूखंडाबाबत गैरव्यवहार झाल्याचा ठपका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ठेवण्यात आला आहे. त्याची पीआयएल सर्वात आधी भाजपच्याच लोकांनी दाखल केली होती, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.