औरंगाबाद | शहरातील वेदांत नगर परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास १६ ते १७ गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चोरीच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
रस्त्यावर लावलेल्या गाड्यांची रात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वाहन चालकांनी आपल्या गाड्यांमधून दोन ते तीन लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे.
वेदांतनगर परिसर हा उच्चभ्रू लोकांची वस्ती मानली जाते. मात्र ही तोडफोड नक्की कोणी केली आणि का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.




