कोल्हापूर | शहरातील देवकर पानंद परिसरातील मनोरमानगर मोहिते मळा नजीक 40 वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात भरून कचरा असलेल्या ठिकाणी टाकल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदरील माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
खून करून महिलेचा मृतदेह किमान चार ते पाच दिवसांपूर्वी आणून टाकण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. मोहिते मळा परिसरात कचरा असलेल्या ठिकाणी रविवारी रात्रीपासून दुर्गंधी येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन कोंडाळ्यातील कचरा बाहेर काढत असतानाच येथे भरलेले पोते आढळून आले.
या पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात भरून येथे टाकून देण्यात आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली.