सोलापूर | लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३ मुली व एक मुलगा भीमा नदीत वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे. उजनी धरणातील पाणी सोडल्याने नदी दूथडी भरून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पाण्यात बुडालेल्या या मुलांचा रात्री उशाशिरापर्यंत शोध सुरू होता. समीक्षा शिवाजी तानवडे (वय- 13), अर्पिता शिवाजी तानवडे (वय- 12), आरती शिवानंद पारशेट्टी (वय-12) आणि विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय- 10) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी 29 मे रोजी दुपारी शिवाजी रामलिंग तानवडे (वय 40, रा. लवंगी, ता. द. सोलापूर) हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. तेथे पाठिमागून त्यांच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता व मेव्हण्याचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे आले होते. तेव्हा शिवाजी यांनी त्यांना घराकडे परत पाठवून दिले. त्यानंतर शिवाजी हे पोहत नदीमध्ये आत गेले असताना थोड्या वेळाने ते चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले. समीक्षा हिस पाण्यात पोहत असताना आरतीने पकडले व अर्पिता हीस विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडू लागले.
यावेळी त्यांचा आवाज ऐकून पोहत असलेले शिवाजी लगेच त्यांच्याजवळ जाऊन समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडले. अर्पिता व विठ्ठल यास सोबत कडेला आणत असताना समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे पुन्हा पाण्यात बुडाल्या. त्यावेळी शिवाजी यांच्या हातातील विठ्ठल व अर्पिता पण निसटले व ते पण बुडाले. त्यावेळी शिवाजी यांचा ही धीर सुटल्याने तेही बुडू लागले. त्यावेळी त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी रामलिंग तानवडे यास बाहेर काढले.