औरंगाबाद | ट्रेकिंगला गेलेल्या मित्रांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तलावात अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्र बुडाले होते. त्यापैकी चौघेजण सुखरूप बाहेर निघाले मात्र एका तरुणाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सातारा डोंगर परिसरातील तलावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लखन ईश्वर पवार, वय-18 (रा. शिवशंकर कॉलोनी, औरंगाबाद) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
या दुर्दैवी घटने प्रकरणी दुपारपर्यंत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज रविवार असल्याने लखन आणि त्याच्या मित्रांनी सातारा परिसरात ट्रेकिंग करण्याचा बेत आखला होता. सकाळीच सात ते आठ मित्र डोंगरांवर गेले होते. मित्रांची धमालमस्ती सुरू होती. दरम्यान, डोंगरावरील तलावात अंघोळीचा मोह मित्रांना आवरला नाही. त्यामुळे सर्वांनी तलावात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. पाण्याचा अंदाज न घेता एका पाठोपाठ तरुण पाण्यात उतरले, काहींनी थेट उडी घेतली. पाणी खोल असल्याने पाचही मित्र गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहून वर असलेल्या मित्राने त्यांच्या शर्टला बांधत ते पाण्यात फेकले. ते शर्ट धरून चौघे पाण्यातून बाहेर आले मात्र लखन सर्वात शेवटी असल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांचा आरडाओरड एकूण ट्रेकिंग आणि व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी तलावाकडे धाव घेत ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिस व अग्निशमन दलालाच्या पथकाने डोंगराकडे धाव घेतली. मात्र तलाव डोंगरावर असल्याने घटनस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
जवानांनी तलावातील पाण्यात उडी घेत लखनला पाण्याबाहेर काढले. दरम्यान तेथे ट्रॅकिंगसाठी आलेल्या नागरिकांमध्ये दोन डॉक्टर देखील होते, त्या डॉक्टरांनी पाण्याबाहेर काढलेल्या लखनला तोंडाने श्वास देण्याचा प्राथमिक प्रयत्न केला मात्र तो शुद्धीवर आलाच नाही. त्याला सातारा पोलिसांच्या वाहनातुन घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून लखनला मृत घोषित केले.