हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रात्रीची वेळ झाली की लोकांना घाबरवण्यासाठी वेगवेगळ्या भयपटांची, मालिकांची निर्मिती केली जाते, हे आपण वर्षानुवर्षे अनुभवत आलेलो आहोतच. दूरदर्शनवरील आप बीती, झी टीव्हीवरील आहट, झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिका त्याचं परफेक्ट उदाहरण म्हणून ओळखल्या जातात. आता लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असलं तरी लोकांच्या डोक्यात या ना त्या पद्धतीने भूत घुसवण्याचा प्रकार सोशल मीडियातून चालूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अंगावर काटा येणारं, मनात धडकी भरवणारं चित्रण पाहून दर्शकही काही काळासाठी घाबरल्याचं या व्हायरल व्हिडियोतून समोर आलं.
एका पार्कमध्ये जिम करण्यासाठी ठेवण्यात आलेली साधने अदृश्य भूतांकडून वापरली जात असल्याची बातमी व्हाट्सअप्प, ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल झाली होती. खांद्याचा व्यायाम करण्यासाठी असलेल्या मशीनमधून आवाज येणे, कुणीही व्यायाम करत नसताना यंत्रं काही वेळेकरता सुरु राहणे अशा गोष्टी घडत असल्याची बातमी व्हायरल करण्यात आली होती. ही घटना झाशी आणि दिल्लीमध्ये असलेल्या पार्कशी मिळतीजुळती असल्याचं वाटल्याने तेथील पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली.
#GhostVideo-II#NoHostForGhost#PolicingTheGhost
#FakeNews
#FakeNewsAlert
#JhansiVideo
#JhansiPolice #SayNoToFakeNews #Ghostbusters
#Ghosts #ghoststories #Jhansi #Police https://t.co/tt7AtYiUxp pic.twitter.com/Y3dH2qqioQ— RAHUL SRIVASTAV (@upcoprahul) June 13, 2020
पोलिसांनी शोध घेतलेल्या ठिकाणी व्हिडियोत दिसत असल्याप्रमाणे काहीच आढळलं नाही. मशीनचा येणारा आवाज हा नुकत्याच लावलेल्या ग्रीसमुळे येत असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. आणि कोणतीही व्यक्ती नसल्याचं व्हिडियोत दाखवत कुणीतरी मशीनला तात्पुरता धक्का देऊन हा व्हिडीओ शूट केल्याचं समोर आलं आहे. या व्हिडियो बनवून व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलीस घेत असून बागेत कुठल्याही प्रकारचं भूत नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.