सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मात्र याच दरम्यान कास बामनोली या परिसरात एक दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पर्यटक बुडाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास म्हावशी गावच्या हद्दीतील शिवसागर जलाशयात मित्रांसोबत गेलेला संकेत संग्राम काळे (राहणार वाठार, तालुका कराड ) हा बुडाला आहे. या घटनेने पर्यटकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पर्यटक बुडाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संकेत काळे हा बुडालेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी शोध मोहीम राबवली आहे. आज बुधवारी सकाळपासून ही शोध मोहीम शिवसागर जलाशयात राबवण्यात येत आहे. मात्र अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे अशा प्रकारे दुर्घटना घडू नयेत म्हणून पुढील तीन दिवस वन विभागाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवला आहे.