कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
विभागीय क्रीडा संकुलातील शुटिंग रेंज साहित्य खरेदी निविदा प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, क्रीडा उपसंचालक डॉ. माणिक ठोसरे व समितीचे सदस्य उपस्थित होते.
शुटिंग रेंज पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने क्रीडा विभागाने सयमबद्ध कार्यक्रम निश्चित करुन काम करावे, अशी सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, शुटिंग रेंज बरोबरच संकुलाच्या दुसऱ्या टप्यातील खेळाडू वसतीगृह व बहुउद्देशीय इमारतीच्या उभारणीबाबत सर्वंकष प्रस्ताव तात्काळ तयार करावा. संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रीयकृत बँकचे एटीएम बसविणे तसेच संकुलामध्ये विंधन विहीर घेणे या गोष्टीही प्राधान्याने कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांबाबत प्रशासकीय सुसूत्रता येण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता आणि लेखाधिकारी या पथकाने आवश्यक ती तपासणी करुन अहवाल सादर करण्याची सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केली. यावेळी विभागीय क्रीडा संकुलाच्या अनुषंगाने सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. क्रीडा उपसंचालक डॉ. ठोसरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात बैठकीसमोरील विषय विशद केले. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी आभार मानले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.