बहिण-भाऊ थोडक्यात बचावले… झाडीत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । वाळवा तालुक्यात अनेक भागांमध्ये गवा दिसून आल्याने नागरिकात भितीदायक वातावरण आहे. दरम्यान काही दिवसांपासून गायब असलेला बिबटया नेर्ले व कापूसखेड परिसरात सक्रिय झाला आहे. गुरूवारी रात्री नेर्ले ते कापूसखेड दरम्यान मार्गावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या बहिण-भावंडावर बिबटयाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून मोटरसायकल वेगाने पळवल्याने मोठा अनर्थ टळला. वाळवा तालुक्यातील महामार्गालगत असणाऱ्या डोंगर व शेताच्या परिसरात बिबटयाचे अनेक दिवसांपासून वास्तव्य आहे.

मध्यंतरीच्या काळात बिबटया दिसून येत नव्हता. गुरूवार दि.6 जानेवारी रोजी कापूसखेड येथील महाविद्यालयीन तरूण अनिकेत पाटील व त्याची बहिण मोटरसायकलवरून नेर्ले येथे पाहुण्यांकडे गेले होते. रात्री 9.30 च्या सुमारास कापूसखेड गावी परतताना नेर्ले येथील कदम वस्तीजवळ ऊसातून बिबटयाने अचानकपणे मोटरसायकलवर झेप घेतली. अनिकेत पाटील याने प्रसंगावधान राखून मोटरसायकल वेगाने पळवली. तरीही बिबटया तब्बल दिडशे मीटरपर्यंत मोटरसायकलचा पाठलाग करत होता.

दरम्यान कासेगाव येथील तिघेजण मोटरसायकलवरून कापूसखेड मार्गे नेर्लेकडे जातानाही बिबटयाने युवकांच्या मोटरसायकलचा पाठलाग केला. तिघा तरूणांनी आरडाओरडा केल्याने बिबटयाने ऊसात धूम ठोकली. या प्रकाराने तिघे युवक पुरते घाबरले होते. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी नेर्ले ग्रामस्थांना दिली. कापूसखेड येथे बिबटयाने केलेल्या हल्ल्याची माहिती मिळताच काही धाडसी युवकांनी बिबटयाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कापूसखेड व नेर्ले दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी मोटरसायकलने प्रवास करू नये. प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगावी असे आवाहन कापूसखेडच्या सरपंच मंदाताई धुमाळे यांनी केले आहे.

Leave a Comment