सिध्दनाथ यात्रा अटी, शर्तीत : नगरप्रदक्षिणा न घालता मैदानातच रथोत्सवास परवानगी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यांचा रविवारी होणारा रथोत्सव सोहळा जिल्हा प्रशासनाने रद्द केला असल्याचं कळताच त्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ आक्रमक झाले होते. म्हसवड गावातील बाजारपेठा सर्व दुकाने बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला. ग्रामस्थ आक्रमक भुमिकेत आहेत असं कळताच प्रशासन म्हसवड मध्ये दाखल झालं. यानंतर ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्ये बैठक झाली . या बैठकीत रथोत्सवाला काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये रथाची नगरप्रदक्षिणा न करता ठरवून दिलेल्या मैदानात हा रथोत्सव करण्याचं सांगण्यात आले आहे.

उद्या रविवारी दि. 5 रोजी पार पडणारा श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा रथोत्सव सोहळा ओमिक्रोन व्हायरसचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केला. या निर्णयाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी स्थानिकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्याची प्रशासनाला विनंती केली होती. यामध्ये रथाची नगरप्रदक्षिणा न करता ठरवुन दिलेल्या मैदानात हा रथोत्सव करण्याचं सांगण्यात आलं आहे.

काही अटीवर परवानगी दिलेली असली तरी भाविकांनी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी सुरु केलेलं आंदोलन आता स्थगित करण्यात आलं असून बंद केलेली बाजारपेठ सुद्धा उघडण्यात आली आहे. मात्र बाहेगावच्या भाविकांना म्हसवड शहर आणि यात्रा मैदानाद प्रवेश बंदी आहे. यात्रा मैदानात विविध व्यावसायिकांची दुकाने थाटण्यास सुद्धा बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या बंदी आदेशामुळे यात्रा मैदान रिकामे दिसत होते.