औरंगाबाद : गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागांतर्गत कौशल्य विकास योजना राबवली जाते. चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील 14 हजार 435 विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास झाला आहे.
मागील वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रशिक्षण बंद होते. 2016 ते मार्च 2020 पर्यंत या चार वर्षात विभागामार्फत 23 हजार 88 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी 19 हजार 497 जण उत्तीर्ण झाले असून त्यातील तब्बल 14 हजार 435 म्हणजे 74.03 टक्के विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत औद्योगिक क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्यात येते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून औरंगाबादेत 317 व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्स परवानगी देण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सज्ज केले जाते.
मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार :
जिल्हा कौशल्य विकास योजने अंतर्गत रोजगार मेळावे घेतले जातात. आतापर्यंत विभागाने पाच मेळावे घेतले असून त्यात 670 आस्थापनांनी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आपला सहभाग नोंदवला आहे. यातून 389 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्याचबरोबर विविध अभ्यासक्रमातील एक लाख 54 हजार 992 उमेदवारांनी रोजगारासाठी विभागाकडे नोंदणी देखील केली आहे.