सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
हौसेला मोल नसतं म्हणतात याची प्रचिती आपल्याला नेहमीच येत असते. अनेक हौशी माणसं आपली हौस पुर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. सातारा जिल्ह्यात असेच एक हौशी व्यक्तीमत्व आहे जे चक्क 8 किलोची नागीण चप्पल वापरतात. सातारा जिल्ह्यातील असलेल्या माण तालुक्यातील जांभुळणी गावचे केराप्पा कोकरे या 60 वर्षांचे गृहस्थ चक्क 8 किलोची चप्पल वापरतात. त्यांची नागीण चप्पल ही संपुर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या केराप्पा यांची वेशभूषा पाहिली तर ते कायम सगळ्यात उठून दिसतात. पायात 8 किलोची नागीण चप्पल ग्रामीण शैलीतील पोषाख डोक्यावर फेटा डोळ्यावर गाॅगल लावला की केराप्पा अगदी साऊथच्या चित्रपटातील मधील हीरोच दिसतात. केराप्पांच्या या लुककडे पाहिलं ही त्यांच वय 60 असेल यावर विश्वासच बसत नाही. वयाच्या 15 व्या वर्षांपासुन केराप्पा कोकरेंना वजणाने जड चप्पल वापरण्याचं वेड आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चप्पल बनवुन त्यांना परिधान सुद्धा केल्या आहेत. चप्पल बनवण्यासाठी कितीही खर्च आला तरी केराप्पा मागे पुढे पाहत नाहीत. आत्ता वापरत असलेली केराप्पांची चप्पल तब्बल 31 हजार रुपयांची आहे.
या चप्पलला केराप्पा पोटच्या मुलासारखे जपतात, चप्पलला रोज अत्तर लावून व्यवस्थित पुसून ठेवण्याचं काम ते नित्यनियमाने करतात. लग्न समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा गजी नृत्यामध्ये केराप्पा ही चप्पल घालून जातात. या 8 किलोच्या चप्पलमुळे केराप्पा यांना सेलिब्रिटी प्रमाणेच वागणूक मिळत असल्याचं त्यांनी सांगितल. केराप्पांनी ही चप्पल अकलूज येथून बनवून घेतली असून यासाठी या चप्पलमध्ये शंभर एलईडी लाईट्स, गोंडे, शंभर घुंगरु, नटबोल्ट, काचेच्या टिकल्या बॅटरी असं सगळं वापरण्यात आले आहे. यामुळे केराप्पांची ही चप्पल एकदम झकासच अशी म्हणावं लागेल.