कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड येथे गणेश विसर्जनात नवनव्या संकल्पना प्रशासनाने राबविल्या. पोलिस व पालिका प्रशानाने अत्यंत चोख केलेल्या नियोजनामुळे गणेश भक्तांना आनंदात आणि जल्लोषात विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेता आला. पारंपारिक वाद्यांसोबत वाजत- गाजत कराड शहर व हद्दीतील 300 गणेश मूर्तीचे कृष्णा घाटावर विसर्जन करण्यात आले. तब्बल 17 तासांनी विसर्जन मिरवणूक संपल्या. मिरवणूकीत अचानक “एकदम ओके, पन्नास खोके” अशा घोषणा दिल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजय असोच्या काहींनी घोषणा दिल्या.
कराड शहरातील अनंत चतुर्थी दिवशी दत्त चाैक, आझाद चाैक, चावडी चाैक आणि मंगळवार पेठतून- चावडी चाैक ते थेट कृष्णा घाटावर जाण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी कर्मचारी नेमून गणेश भक्तांना मदत केली जात होती. नदीकाठी पालिका प्रशासनाने गणपती विसर्जनासाठी जय्यत तयारी करून नागरिकांना मोठे सहकार्य केले. नदीपात्रात गणपती मूर्ती सोडण्यासाठी तरफा ठेवण्यात आल्या होत्या, त्यामध्ये पालिकेचे कर्मचारी मूर्तीचे संकलन करून विसर्जन करत होते.
सातारा येथे "नाद एकच बैलगाडा शर्यत" गाण्यावर ठेका धरला. @HelloMaharashtr pic.twitter.com/d8hmQQE8le
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) September 10, 2022
कराड शहरातील विसर्जन मार्गाचा आढावा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अजितकुमार बोऱ्हाडे, पोलिस उपविभागीय अधिकारी डाॅ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक राजू डांगे यांच्यासह पालिका प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.
गणेश भक्तांच्या दुचाकी- चारचाकी नदीपात्रात पार्किंगसाठी सोय ः- कराडच्या प्रशासनाने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांच्या गाडीची पार्किंग सोय थेट नदीपात्रात केली होती. कोणताही अडथळा निर्माण होवू नये. यासाठी एकेरी वाहतूक पध्दत अवलंबली होती. पालिका व पोलिस यांच्याकडून स्पीकर लावून योग्य सूचना दिल्या जात होत्या.
शहरात दुकाने बंद, महिला- पुरूषासाठी स्वतंत्र व्यवस्था ः- शहरातील विसर्जन मार्गावरील दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे खरेदी- विक्री व्यवहार या मार्गावर पूर्णपणे बंद होता. तसेच कोणतेही वाहन मार्गावर थांबविण्यास मनाई करण्यात आली होती. त्याकरिता प्रत्येक चाैकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शहरातील छोटे- छोटे मार्ग, रस्ते बंद ठेवण्यात आले होते. शहरात विसर्जन मिरवणूक व्यवस्थरित्या पाहता यावी. यासाठी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन मार्गावर एका बाजूला पुरूष तर दुसऱ्या बाजूला महिलांना बसण्याची व्यवस्था केली होती.
रणजित पाटील (नाना) मित्र समूहाकडून हजारोंना मोफत अन्नदान ः- कराड शहरातील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील मित्र परिवारांकडून सकाळी 10 वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपपर्यंत हजारो लोकांना मोफत अन्नदान करण्यात आले. तसेच पोलिस व पालिका प्रशासनासाचीही सोय केली होती. या मित्र परिवाराकडून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असतो.
मूर्ती व निर्माल्य संकलानासाठी स्वतंत्र व्यवस्था ः- नगरपालिकेकडून गणेश मूर्ती तसेच निर्माल्य संकलनासाठी ट्रक्टर ठेवण्यात आले होते. तसेच 21 ठिकाणी जलकुंड ठेवण्यात आले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गणेश मूर्तीचे पावित्र्य राखत संकलन केले.
बी. आर. पाटील यांच्या गाण्याला उत्स्फूर्त दाद ः- कराड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी विसर्जन मिरवणूकीत गाणे म्हटले. या गाण्याला उपस्थित गणेश भक्तांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी अनेक तरूण- तरूणी व महिलांनी तसेच गणेश भक्तांनी बी. आर. पाटील यांच्यासोबत फोटोही काढले. बी. आर. पाटील हे संपूर्ण 17 तास गणपती विसर्जन मिरवणूकीत उभे होते.