काँग्रेस अध्यक्ष होणार का?? राहुल गांधींच्या उत्तराने सस्पेंस वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्याच नावाची मागणी करत आहेत पण राहुल गांधी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे समोर आलं होत. पण आता मात्र अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून संपूर्ण देशभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अध्यपदाच्या शर्यतीतून बाहेर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही, हे काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका झाल्यावर कळेल. मला काय करावे याबद्दल मी पूर्णपणे ठरवलं आहे. माझ्या मनात कोणताही गोंधळ नाही असेही राहुल गांधी म्हणाले. मात्र, आपला निर्णय काय आहे, हे त्यांनी उघड केले नाही.

2019 मध्ये अध्यक्षपद सोडले

2017 मध्ये राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, मात्र 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमध्ये जबाबदारी घ्यावी लागते, त्यामुळे मी पद सोडत असून कुणाला तरी अध्यक्ष बनवावे, असे राहुल म्हणाले होते.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे . अशोक गेहलोत यांच्या नावासाठी पक्षातील अनेक जण उत्सुक आहेत. सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, स्वत: अशोक गेहलोत यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यातच काँग्रेसने मुकुल वासनिक यांची मध्य प्रदेशच्या प्रभारी पदावरून हकालपट्टी केल्यांनतर त्यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष बनवता येईल का, अशीही चर्चा आहे.