Satara News सातारा पालिकेवर झोपडपट्टीवासीयांचा धडक मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपडपट्टीवासीयांसाठी साकारल्या जात असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका किमान 500 स्क्वेअर फुटांच्या असाव्यात, या मागणीसाठी रिपाइं मातंग आघाडीचे अध्यक्ष किशोर गालफाडे यांच्या नेतृत्वाखाली माजगावकर माळ झोपडपट्टीवासीयांनी शुक्रवारी सातारा पालिकेवर मोर्चा काढला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम विभागाने मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांना आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, माजगावकर झोपडपट्टीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या झोपड्या पाडून त्यांना पंतप्रधान आवास योजनेत घरकुल दिले जाणार आहे. यासाठी पालिकेने झोपडपट्टीधारकांना जागा मोकळी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र, प्रस्तावित चोरगे माळावरील जागा अत्यंत अपुरी आहे. प्रस्तावित जागेवर एक गुंठा जमीन, वीज, पाणी, रस्ते, शौचालय इत्यादी मूलभूत सुविधा तातडीने देण्यात याव्यात, घरकुलाची सात लाख रुपये इतकी रक्कम कमीत कमी चार लाख रुपये करण्यात यावी, सदनिका ३०० स्क्वेअर फुटांऐवजी 500 स्क्वेअर फूट करण्यात याव्यात, अशा मागण्या लाभार्थींनी निवेदनात केल्या आहेत.

पालिकेने संबंधित सुविधा आणि बांधकामातील बदल याचे लेखी निवेदन द्यावे आणि पुनर्वसनासाठी दोन महिने मुदत मिळावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत झोपडपट्टीधारक आपली जागा सोडणार नाहीत, असा इशारा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. मोर्चात सुमारे 350 लाभार्थी सहभागी झाले होते.