हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी आपल्या आई – वडिलांना काम करताना पाहून त्यांचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करतात. ज्या आई वडिलांनी आपल्याला कष्टानं मोठं केलं, वाढवलं त्यांचं स्वप्न कसल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची जिद्द अनेक तरुणी करतात. अशीच जिद्द सोलापूरच्या एका तरुणीनं मनाशी केली आणि वडील आयुष्यभर ज्या साहेबांना सलाम ठोकत होते, त्या वडिलांची मुलगी आता न्यायाधीश झाली. सोलापूरच्या स्नेहा सुनील पुळुजकर यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश मिळवले आहे, पाहूया तिची यशोगाथा…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील स्नेहा सुनील पुळुजकर यांनी यश मिळवलं आहे. ज्या मुलीचे वडील आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकत होते, ती मुलगी आता न्यायाधीश होणार आहे. स्नेहा यांचे वडील सुनील पुळुजकर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आहेत. तिची आई उज्ज्वला या जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका आहे.
भाड्याच्या घरात वडिलांकडून मुलांना उच्च शिक्षण
स्नेहाहिचे वडील सुनील व आई उज्ज्वला यांनी त्यांचा संसार भाड्याच्या घरातच सुरू केला. त्यांना सुजित, सुयश व स्नेहा ही तीन मुले झाली. त्यांनी स्वत:चे घर घेण्यापेक्षाही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मुलगा सुजित बंगळूर याला शिकवून त्यांनी स्वॉफ्टवेअर अभियंता केले. तर सुयश सोलापूर न्यायालयात वकिली करत आहे. आता स्नेहा न्यायाधीश झाली आहे.
सुवर्णपदकाही केली कमाई
स्नेहा हिने आपले सर्व शिक्षण सोलापूर येथील सेवासदन प्रशालेत पूर्ण केले. तिने दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान केले. त्यानंतर ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी, दयानंद लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. सोलापूर विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवत एल. एल. एम. पूर्ण केले. आई-वडील नोकरीला गेल्यावर घरातील कामे करून स्नेहा स्वत: अभ्यास करत होते. परीक्षेसाठी रोज स्नेहाने दहा ते बारा तास अभ्यास केला.
15 ते 18 तास केला अभ्यास
स्नेहा ही इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवीधर इंजिनियर आहे. यामध्ये तिने विद्यापीठातून सुवर्ण पदकही मिळवला आहे. त्यानंतर पुन्हा स्नेहाने सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अंतिम वर्षात असताना तिने एमपीएससीची तयारी सुरू केली. दररोज 15 ते 18 तास अभ्यास करीत यश खेचून आणलं.
हलाखीच्या परिस्थितीत बदलाची आशा
आई उज्वला जिल्हा आरोग्य विभागात शिपाई तर वडील सुनील हेही जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आहेत. तीन मुलांचा सांभाळ करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना नेहमीच काटकसर करावी लागायची.तरीपण, मुले नोकरीला लागली की परिस्थिती नक्की बदलेल, ही जिद्द उराशी बाळगून आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढला. ही जाण ठेवत मुलीने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे.