पुणे प्रतिनिधी । भारत माझा देश आहे…? सारे भारतीय माझे बांधव आहेत…? माझ्या देशावर माझे प्रेम आहे…? माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…?आपली हि प्रतिज्ञा पुन्हा एकदा पडताळून पहायला हवी अशी आजची परिस्थिती आहे. व्यवस्थित या प्रतीज्ञेकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल कि, प्रत्येक विधानामागे एक अदृश्य प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आठवतात ते जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज. ते एका ठिकाणी म्हणतात ” धर्माचा ध्वज धर्मांधांच्या खांद्यावर जातो, तेव्हा वाहते ते त्याच धर्माचे असते व मग उकिरड्यावरचे कागद खाणारे गाढव जसे मनाचे श्लोक व मटक्याचे आकडे यात भेद करीत नाही तशी स्थिती अस्तित्वात येते “
हि सर्व परिस्थिती आपण उघड्या डोळ्याने पहात आहोत. सध्यस्थितीमध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण ज्या दिशेने जाताना आपण पहात आहोत ते पहाता नितीमत्ता, माणुसकि, भूतदया या शब्दांना माणसाने तिलांजली दिलेली आहे, असे दिसून येत आहे. या विपरीत गोष्ट आहे ती एका श्वानाची त्याचे नांव “जंजीर”. त्याची पुण्यतिथी करण्याचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे.
१९९३ मध्ये मुंबई मध्ये झालेली बॉम्बस्फोट मालिका आठवली कि, अजूनही ते विदारक चित्र डोळ्यासमोरून जात नाही. अन्नाचा घासही मुखामध्ये जात नाही. त्यावेळेस कोणासही ह्या विदारक सत्याची कल्पना नव्हती कि झालेले बॉम्बस्फोटहे फक्त नमुन्यावारी झाले. जर “जंजीर” नसता तर, आज जी मुंबई आपण पहात आहोत, ती मुंबई आपण पहिली असती का ? ज्या “जंजीर” ने आपल्या आठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या दैवी देणगीवर ३,३२९ किलो आरडीएक्स, ५७ गावठी बॉम्ब, १७५ पेट्रोल बॉम्ब, १८ लष्करी बॉम्ब २४९ हँङ ग्रेनेड, ६०० डीटोनेटर्स, २५ एके ५६ व ५७ बनावटीच्या रायफल्स, ९ मी.मी. ची ५ पिस्तुल, ६४०६ काडतुसे, ९ जिलेटीन व ५ किलो इतर स्फोटके शोधून काढली.
जर दहशतवाद्यांनी आणलेल्या आरडीएक्सचा वापर झाला असता तर… याची कल्पनाच करवत नाही.अशा या बहादूर “जंजीर”ने आपल्या कारकीर्दीमध्ये दहशतवाद्यांनी मुंबई मध्ये आणलेल्या स्फोटकांचा, हत्यारांचा, दारुगोळ्यांचाआपले सर्वस्व पणाला लावून शोधून काढले. व हे करीत असताना स्फोटकांचा वास व त्यातील रसायनांचा परिणाम त्याच्या फुफ्फुसावर, मेंदूवर खोलवर झाला. त्यामुळे आयुष्याच्या अखेरची ती महिने त्याने रुग्णालयामध्ये काढली. व त्यातच त्याचा दुखःद अंत झाला.
या ठिकाणी कोणी मनुष्य प्राणी असता तर त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या शौर्याच्या कथा सांगून आपापली घरं भरली असती. पण “जंजीर”च्या मागे कोण आहे ? व हीच माणुसकीची भावना ठेवून नेताजी सुभाष चंद्र बोस प्रतिष्ठान पुणे याच्या माध्यमातून “जंजीर”च्या बहादुरीची गाथा सांगण्यासाठी, सन २००१ पासून आजतागायत न चुकता कोणत्या न कोणत्या स्वरूपात श्रद्धांजली अर्पण केली जाते. ” जंजीर”चे मानवजातीवर न फेडण्याइतपत उपकार आहेत. परंतु एक माणूस म्हणून मानवता दाखवून त्याला श्रद्धांजली वाहून त्याच्या उपकाराची जाण ठेवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करीत आहोत असं मत संस्थेच्या दिलीप मोहिते यांनी व्यक्त केलं.
माणसाच्या वैश्विक जगामध्ये जेव्हा माणूस माणूसपणाच्या कर्तव्यापासून दूर झाला आहे. तिथे आपला “सहजधर्म” पाळणारा “जंजीर”चा कर्मवाद व कर्माचाच धर्मवाद मोडून पडला आहे. दहशतींच्या ज्वालांची धग कमी करण्यात ज्या गुणवन्ताने माणसालाही मान खाली घालावयास लावली, माणसापेक्षा श्रेष्ठ गुणवत्ता व्यक्त करणाऱ्या या “महाप्राण्यास” नम्रतापूर्वक कोटी कोटी प्रणाम ! ! ! ! !