हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्याभरापासून इलेक्ट्रिक गाडयांना आग लागण्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका माणसानेच चक्क आपल्या गाडीला आग लावली आहे. हि घटना तामिळनाडूमधील आहे. याविषयीची अधिक माहिती अशी कि तामिळनाडूमधील एका व्यक्तीने आपली OLA S1 प्रो स्कुटर पेट्रोल टाकून जाळली आहे.
सदर घटना तामिळनाडूतील अंबुर बाईपास रोड जवळील आहे आणि आपल्या गाडीला आग लावणाऱ्या या व्यक्तीचे नाव डॉ. पृथ्वीराज आहे. बातमीनुसार, सदर व्यक्तीने हि गाडी काही दिवसांपूर्वीच खरेदी केली होती. कंपनीने दिलेल्या दाव्यांनुसार ती गाडी नीट काम करत नव्हती. यामुळे तो खूप वैतागला होता. त्याची गाडी निटपणे परफॉम करत नव्हती की ऍव्हरेज देत नव्हती.
फेब्रुवारीमध्ये त्या व्यक्तीला गाडीची डिलिव्हरी मिळाली होती. अगदी सुरुवातीपासून गाडी नीट चाल नव्हती. त्याने ओला सपोर्टशी देखील संपर्क केला मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशातच केवळ 44 किलोमीटर चालल्यानंतर गाडी अचानक बंद पडली. जी काही केल्या सुरु होईना. त्यामुळे वैतागून शेवटी त्या व्यक्तीने पेट्रोल टाकून आपली गाडी पेटवून दिली.
गाडयांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे OLA ने आपले 1,441 यूनिट्सना रिकॉल केले आहे. Ola Electric ने ग्राहकांकडून आपल्या गाड्या परत मागविल्या आहेत. गाड्या परत मागविन्याची ही पहिलीच घटना नाही याआधी देखील दोन मोठ्या इलेक्ट्रिक बाईक्स कंपन्यांनी ग्राहकांकडून गाड्या परत मागविल्या आहेत.
आग लागण्याच्या या घटनांची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. आग लागण्याच्या घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत असा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कंपन्यांना मोठा दंड ठोठावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.